सहीबद्दल थोडी माहिती.!

केवळ साक्षरच नव्हे तर , निरक्षरांचाही ज्या स्वाक्षरीशी संबंध येतो तिला प्रत्येकाच्या जीवनात मोठे मानाचे स्थान आहे . स्वाक्षरी म्हणजेच सही ! सर्वसामान्यांपासून शासकीय अधिकारी , राजकीय नेते मंडळी अशा सर्व घटकांचा स्वाक्षरीशी नित्याचा संबध असतो . सही मिळवणे हे तसे सोपे काम नाही . कदाचित याचा अनुभव बालपणी मराठी शाळेपासून प्रत्येकाने घेतलेला असेल . आपली स्वाक्षरी म्हणजे, ती आपली मोहर समजली जाते . यामुळे आपली सही, ही दुसऱ्या व्यक्तीला सहजपणे करता येणार नाही अशी असावी असा संकेत आहे . कधीकधी ही सही एक मिनिटात तर , कधी एक महिना वा एक वर्षदेखील प्रतीक्षा करायला लावते . अनुभवी मंडळींच्या मते ‘ सही ‘ आणि ‘ वजन ‘ यांचा परस्पर संबंध असतो . तुमचे वजन असेल ( शारीरिक नव्हे ) आणि तुमची वजन ठेवायची तयारी असेल तर , सही झटपट मिळते असे म्हणतात. एकंदरीत स्वाक्षरी जीवनात आपल्याला खूप काही शिकवून आणि अनुभव देऊन जाते यात शंका नाही .

अहो , माझी सही एवढी हलकी नाही तिला वजन आणि किंमत आहे . अशा प्रकारची वाक्ये ऐकायला मिळाली की , आपण लालफितीच्या कारभाराजवळ आल्याची जाणीव आपोआप होऊन जाते. सहीला वजन आणि किंमत असते , याचा स्पष्ट अर्थ काय ? हे अशिक्षित व्यक्तीदेखील मनोमन समजून जाते . सही मिळविण्यासाठी वजन ठेवणे म्हणजे काय ? याचाही अर्थ उलगडतो . एवढीशी सही , त्यात काय एवढे ? असे म्हणून चालत नाही . या एवढ्याशा सहीची ऐट खूप मोठी असते . व्यक्तीच्या मानसन्मानापेक्षा सहीचा मान मोठा असतो . सही , हा देखील मानलं तर एक छोटा अलंकारच आहे . आपली सही सुंदर असावी असे प्रत्येकाला वाटते . याबरोबरच ती असामान्य असावी यावरही भर दिला जातो . जीवनात जेंव्हा नोकरी – व्यवसायाच्या माध्यमातून स्थिर होण्याची वेळ येते , त्यावेळी प्रथम सहीची निश्चिती करण्यावर भर दिला जातो . आपली सही सुंदर व रुबाबदारअसावी यासाठी दिवसरात्र सराव केल्याच्या आठवणी आजही प्रत्येकाजवळ असतील . व्यक्तीचा स्वभाव त्याच्या सही करण्याच्या पध्दतीवरूनही ओळखता येतो . सहीतील सर्व अक्षरे वाचता येणे तसे अवघडच असते .

प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या स्वाक्षऱ्या त्यांच्या सारख्याच उत्तुंग असतात . त्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाची , मानसन्मानाची उंची दिसून येते . आपली स्वाक्षरी दमदार आणि थोडी ‘ हटके ‘ असावी असे वाटणे काही गैर नव्हे . मानवाच्या या स्वभावामुळे स्वाक्षरीतही एक लकब तयार झाली . स्वाक्षरी सुंदर असावी असे प्रत्येकालाच वाटते. यामुळेच स्वाक्षरीला वेगळं रूप देण्याचे प्रयत्न आवर्जून केले जातात . एकवेळ स्वाक्षरी करणारी व्यक्ती रुपवान नसेल , पण त्याची स्वाक्षरी नक्कीच रुबाबदार असते हा मानवी स्वभाव आहे . स्वाक्षरीला कोणी कोणते पेन वापरावे ? याचेही संकेत आहेत . स्वाक्षरीच्या शाईचा रंग बदलला की , ती करणाऱ्या व्यक्तीचा हुद्दा कोणता ? हे सहज लक्षात येते . असं म्हणतात की , बडी राजकीय मंडळी आपल्या स्वाक्षरी साठी विविध रंगांची शाई वापरतात . स्वाक्षरीच्या रंगात असणारे संकेत त्यांच्या स्वीय सहाय्यकांना बरोबर कळतात . न बोलता व्यवहार करण्याची ताकद स्वाक्षरी मध्ये सामावली आहे एवढे मात्र नक्की .

संख्याशास्त्र आणि स्वाक्षरी यांचा खूप जवळचा संबंध आहे . आपली स्वाक्षरी जशी रुबाबदार असावी , तशी ती ‘ लकी ‘ असावी असेही प्रत्येकाला वाटत असते. यामुळे बहुतांश मंडळी आपल्या स्वाक्षरीत कोणती अक्षरे यावीत , तिचे वळण कसे असावे ? याचा सल्ला संख्याशास्त्र तज्ञांकडून घेत असतात . स्वाक्षरी खाली रेष असावी की नाही , टिंब द्यावीत की नाही ? गोल करावा का , अवघड असावी की , सहजसोपी? असे एक ना अनेक प्रश्न स्वाक्षरीच्या शास्त्रात गुंतलेले असतात . यावर विश्वास किती ठेवायचा ? आणि ठेवायचा की नाही ? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो . मात्र शास्त्राच्या आहारी न जाता त्यातील संकेत समजावून घेण्यात आणि त्यांचा वापर करण्यात काहीच गैर नाही . स्वाक्षरी पाहिल्यानंतर ती नाजुक वळणदार आणि अलंकारिक असेल तर , ती करणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर आणि अभिमान वाटू लागतो . एकप्रकारे स्वाक्षरीची ही ताकतच म्हटली पाहिजे . मात्र आपली स्वाक्षरी दुसऱ्या व्यक्तिला जशीच्या तशी करता येऊ नये , अशी अवघड पण रुबाबदार असावी हे महत्वाचे ठरते . खोट्या स्वाक्षऱ्या करून अनेक गैरप्रकार घडत असतात , ते टाळण्यासाठी स्वाक्षरी ही ‘ हटके ‘ असणेच गरजेचे आहे .

स्वाक्षरीची ओळख टक्केवारी जवळ असते असं म्हणतात . आधी टक्केवारी कळली आणि समाधान झाले तरच स्वाक्षरी केली जाते . तसं म्हटले तर , ही पध्दत प्रत्येकाच्या बालपणाशी निगडित आहे . प्रगतीपुस्तक – टक्केवारी आणि कठोर स्वभावाच्या वडिलांची स्वाक्षरी घेणं . हे खूप अवघड काम पार पाडताना अनेकांना आपल्या आईच्या पदराचा आधार घ्यावा लागला असल्याची आठवण गाठी असेलच . प्रगतीपुस्तक गुणांनी कितीही वजनदार असले तरी ,स्वाक्षरी मिळण्यापूर्वी यथेच्छ मार हा ठरलेलाच असायचा . हवं तर हा एक साग्रसंगीत कार्यक्रमच म्हणा हवं तर . बालपणी कितीही गुण मिळवले तरी , वडील समाधानी व्हायचे नाहीत . त्यावेळी हे सारे नको वाटायचे , राग यायचा . मात्र त्यामागील वडिलांची खरी इच्छा कळायला बालपण सरून वयानं मोठे व्हावे लागतं हेच खरं . त्याकाळात एकवेळ शाळेतील मुख्याध्यापकांची वा गुरुजींची स्वाक्षरी मिळवणे सोपे पण घरी वडिलांची स्वाक्षरी मिळवणे कठीण , अशी स्थिती होती . त्याकाळात वडिलांच्या रूपाने घरी असणारे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आणि शिस्तीचे समजले जात . बदलत्या काळात वडिलांमध्ये असणारा मुख्याध्यापक लोप पावला आणि शिस्तीला उतरती कळा लागली . सध्याच्या काळात प्रगती पुस्तकावर वडिलांची सही मिळवणे फारसे अवघड राहिले नाही . यामध्ये मुलांची प्रगती आणि ती नसेल तर , मुलांबाबत असणारी भीती ही परस्पर विरोधी कारणे दडलेली असतात .

आज स्वाक्षरी या विषयावर लिहिलेच आहे तर , नव्याने आपल्या सहीकडे पाहू या . स्वाक्षरीला रुप असते , ती अलंकारिक , नाजुक आणि वेगळ्या लकबीची असावी हे लक्षात घेऊन आपली स्वाक्षरी अक्षरासारखी वळणदार बनवू या . याबरोबरच स्वाक्षरीसारखा आपला स्वभावही मोकळा करू या . बालपणापासून अगदी संसारी होईपर्यंत आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी मिळवताना आलेल्या बऱ्या – वाईट अनुभवांच्या आठवणी काढून त्यात रमण्याचा रमणीय आनंद घेऊ या . स्वाक्षरी हा शब्द तीन अक्षरी खरा पण त्यात मोठ्या निर्णयाची ताकद सामावलेली आहे . आपल्या मातृभाषेवर प्रेम असणारी मंडळी त्या – त्या भाषेतच आपली स्वाक्षरी करतात . स्वाक्षरी कशी असावी , कोणत्या भाषेत असावी , केवढी असावी ? याचे स्वातंत्र्य असण्याची ताकद तिच्यात असल्यामुळे स्वाक्षरीला असणारे महत्व अनंतकाळ अबाधित राहणार एवढं नक्की !

27 thoughts on “सहीबद्दल थोडी माहिती.!”

 1. खूप छान लेख आहे सहीवर…
  सही चा अर्थ कल्यालाच जाणवलं..
  पण मी कितीदा तुम्हाला माझी सही मागीतली.. तुम्ही अजून दिली नाही 😟

  Reply
  • खूप नाव आल्यामुळे थोडं प्रत्येकाला लगेच सही देता नाही आली त्याबद्दल क्षमस्व…माझी नोकरी सांभाळून मी मोफत सही मार्गदर्शन देत असतो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

   Reply
 2. बर्‍याच वेळा पोस्ट लाईक शेअर करूनही अद्याप पर्यंत माझ्या सुंदरदास कांबळे नावाची मराठी सही अजून पर्यंत प्राप्त झाली नाही सर….
  तुम्ही नौकरी सांभाळून सही बनवण्यासाठी जे कौशल्य विकसित करता ते वाखाणण्याजोगे आहे… लवकरच माझी सही नमुना द्याल हि अपेक्षा आहे….. तुम्ही अपेक्षाभंग करणार नाहीत हीच अपेक्षा करतो…..

  Reply
 3. बर्‍याच वेळा पोस्ट लाईक शेअर करूनही अद्याप पर्यंत माझ्या प्रशांत करंबेळकर नावाची मराठी सही अजून पर्यंत प्राप्त झाली नाही लवकर पाढवावी

  Reply
 4. खुपच छान आहे लेख वाचून मला खूप आनंद झाला असून ते लवकरच मला माझ्या सही चा मजकुर मला पाठवा 🙏

  Reply
 5. माझे नाव श्रीपाद मधुकर सावंत मी तुम्हांला पाठवले आहे पण तुम्ही अजून माझी सही नाही पाठवली
  सर तुमची कला खूप छान आहे तुम्हांला खूप खूप शुभेच्छा
  माझी सही लवकर पाठवा

  Reply

Leave a Comment